लांजा:- घराशेजारील चिऱ्याचा बांध घालत असताना पावसामुळे हा बांध कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडल्याने या घटनेत ती गंभीर जखमी झाली. लांजा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी २२ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास आरगाव बौद्धवाडी येथे घडली. या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव कल्पना कमलाकर यद्रे (वय ३९, राहणार आरगाव कुणणेगाव) असे आहे. कल्पना यद्रे ही सोमवारी आरगाव बौद्धवाडी येथील मुकुंद कदम यांच्याकडे मजुरीच्या कामाला गेली होती. त्यांच्या घराच्या शेजारील चिऱ्याचा बांध बांधण्याचे काम सुरू होते. कल्पना यद्रे ही त्या ठिकाणी मातीचा भराव टाकत होती. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने अचानकपणे चिऱ्याचा बांध कोसळला. यावेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या कल्पना यद्रे हिच्या अंगावर हा बांध कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कल्पना यद्रे हिला तातडीने अधिक उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास तिचे निधन झाले. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. डी. जाधव हे करत आहेत.









