रत्नागिरी:- शहराचा पाणी पुरवठा आता नियमित पावसाळा सुरू होईपर्यंत प्रत्येक सोमवारी बंद राहणार आहे. शासनाने सुपर अल लिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी साठ्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा समिती सभापती निमेश नायर यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत त्याचा खुलासा केला. या पाणी कपातीला सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली.
शहराला शीळ धरणातून पाणी पुरवठा केला जातो. प्रतीदिन १८ ते २० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. या प्रमाणानुसार शीळ धरणात ४५ दिवस पाणी पुरेल इतका पाणी साठा आहे. परंतु आता तापमान वाढले आहे. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात अलनिनोच्या संकटामुळे पाऊस उशीरा सुरू होऊन प्रमाणही कमी असणार आहे. या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्यासंदर्भात योग्य काळजी घेण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पार पडली. यावेळी गॅस वाहिनी टाकण्यासाठी आणि इतर कामांसाठी खोदाई होत असताना जलवाहिन्या फुटतात. ही कामे अजूनही सुरू असल्याने यासंदर्भातील विषय सभागृहात चर्चेला आला. त्यावेळी पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी खोदाईच्या कामामुळे जलवाहिनी फुटत आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. अशावेळी अचानक पाणी पुरवठा खंडित करण्याची वेळ येते. शीळ धरण परिसरातील वीज पुरवठासुद्धा देखभाल दुरुस्तीसाठी सोमवारचा बंद ठेवला जात आहे. या कारणासह दर सोमवारचा पाणी पुरवठा बंद ठेवणे योग्य ठरेल असे सांगितले. सर्व नगरसेवकांनी त्यांच्या या सूचनेला पाठिंबा दिला. त्यामुळे पावसाळा नियमित सुरू होईपर्यंत प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.









