Monday, May 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी आरे-वारे पॉईंट येथे पार्क केलेली फोर व्हिलर कोसळली समुद्रात 

आरे-वारे पॉईंट येथे पार्क केलेली फोर व्हिलर कोसळली समुद्रात 

रत्नागिरी:-  रत्नागिरीतील सर्वात फेमस असलेल्या आरे – वारे पॉईंट येथे बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. आरे – वारे पॉईंट येथे उभी करून ठेवलेली चारचाकी गाडी पावसाने निसरड्या झालेल्या उतारावरून थेट शंभर ते दीडशे फूट थेट खाली समुद्रात कोसळली. यावेळी गाडीतील पर्यटक फोटो काढण्यासाठी बाहेर आले असल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. 

बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सांगली येथील दोन पर्यटक पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने रत्नागिरीत दाखल झाले होते. आरे – वारे येथील पॉईंट नजीक आल्यानंतर या पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडी समुद्राच्या दिशेने पार्क केल्यानंतर या दोघा पर्यटकांनी फोटो काढण्यास सुरुवात केली. मात्र याचवेळी गाडी अचानक समुद्राच्या बाजूने झुकली अन् क्षणार्धात आरे वारे पॉईंट वरून थेट शंभर ते दीडशे फूट खोल खाली कोसळली. 

गाडी समुद्रात कोसळताच जमलेल्या पर्यटकांनी एकच गोंधळ सुरू केला. या दुर्घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी येथील पोलीस पाटील आदेश कदम यांना दिली. शंभर ते दीडशे फूट खोल खाली कोसळलेली चारचाकी गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेन ची मदत मागवण्यात आली. संबंधित कार चालक याने आपण हँडब्रेक लावले होते तरी देखील कार खाली कोसळली असा सवाल उपस्थित केला. स्थानिकांच्या सहकार्याने सायंकाळी उशिरा क्रेनच्या मदतीने कोसळलेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.