Tuesday, June 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत अन्न व औषध प्रशासनाचा दणका; साडेतेरा हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

रत्नागिरीत अन्न व औषध प्रशासनाचा दणका; साडेतेरा हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कुवारबाव परिसरातील एका दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून तब्बल १३ हजार ५६७ रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुवारबाव बाजारपेठेत असलेल्या ‘भराडीन जनरल स्टोअर्स’मध्ये प्रतिबंधित आणि आरोग्यास अपायकारक पान मसाला व गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रशासनाच्या पथकाने दुकानावर छापा टाकला.

तपासणीदरम्यान दुकानातून ७१ पॅकेट्स आणि ९५ पाउच असा एकूण १३,५६७ रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला. आरोग्यास घातक ठरणारे पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर आटपाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संबंधित दुकानदारावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.