Monday, May 11, 2026
spot_img
Home लांजा भरधाव वॅगनआरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव वॅगनआरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर खान प्रमेय एनर्जी सर्व्हिस पंपाजवळ कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल स्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, कार चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष किसन धाडवे (वय ३३, रा. मठ कडुगाव, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे या अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी कार चालक दीपक भिवाजी पवार (वय ५१, रा. वेरवली बुद्रुक, ता. लांजा) हा आपली वॅगनआर कार (क्रमांक MH-05-EV-6435) घेऊन रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने जात होता. खान प्रमेय एनर्जी सर्व्हिस पेट्रोल पंपाजवळ आल्यावर, रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता कार चालकाने वाहन अतिवेगात आणि बेदकारपणे चालवले. यावेळी रस्ता ओलांडून पलीकडे जाणाऱ्या मोटारसायकलला (क्रमांक MH-04-DL-7996) कारने जोरदार धडक दिली.

या धडकेत मोटारसायकल स्वार आशिष धाडवे यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची भीषणता इतकी होती की, त्यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आशिष यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलीस हवालदार रोशन चंद्रकांत सुर्वे यांनी फिर्याद दिली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कार चालक दीपक पवार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६, २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा (रजिस्टर नंबर ४६/२०२६) दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.