Thursday, October 22, 2026
spot_img
Home लांजा कुत्र्याला वाचवताना रिक्षा उलटून देवधेच्या उपसरपंचांचा दुर्दैवी मृत्यू

कुत्र्याला वाचवताना रिक्षा उलटून देवधेच्या उपसरपंचांचा दुर्दैवी मृत्यू

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा नजीक धनावडे फार्मजवळ आज दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात देवधे गावचे विद्यमान उपसरपंच संजय नारायण मणचेकर (वय ४२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय मणचेकर हे व्यवसायाने रिक्षाचालक असून ते लांजा शहरातून आपल्या घरी देवधे येथे दुपारच्या जेवणासाठी रिक्षा घेऊन निघाले होते. त्यांची रिक्षा महामार्गावरील धनावडे शेती फार्म परिसरात आली असता, अचानक एक भटकते कुत्रे वाहनासमोर आले. कुत्र्याला वाचवण्यासाठी त्यांनी चालकाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला असता रिक्षा अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात मणचेकर यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच त्यांचे चुलतभाऊ प्रकाश जानू मणचेकर यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने लांजा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

संजय मणचेकर हे देवधे गावच्या विकासात नेहमी अग्रेसर असणारे एक कार्यक्षम आणि मनमिळाऊ लोकप्रतिनिधी म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या अशा अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण देवधे गावावर तसेच लांजा परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.