Wednesday, October 21, 2026
spot_img
Home लांजा अंजणारी पुलावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी; चालक जखमी

अंजणारी पुलावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी; चालक जखमी

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर सोमवारी सकाळी ब्रेक फेल झाल्यामुळे मासळीची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, ट्रकमधील मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथून गोव्याच्या दिशेने मच्छी भरून निघालेला ट्रक (क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ४६८६) सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता. अंजणारी पुलाजवळ येताच वाहनाचे अचानक ब्रेक फेल झाले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावरच पलटी झाला. या भीषण अपघातात सुदीप दुबे (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. दापोली) हा चालक किरकोळ जखमी झाला. अपघात घडताच ट्रकमधील मासळी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेनंतर जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.