रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथे दारूच्या नशेत असलेल्या रिक्षाचालकाने एका ६२ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. सुरेश काळ्या पवार (वय ६२, रा. पोमेंडी बद्रक, बौद्धवाडी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश पवार हे ८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास आपल्या घराजवळील नारळाच्या बागेतून गरे घेऊन येत होते. त्याच वेळी आरोपी किशोर लकाजी पवार हा आपली रिक्षा (क्रमांक एम.एच.-०८/एक्यु/१३७१) फिर्यादीच्या अंगावर घालण्याच्या उद्देशाने वेगाने घेऊन आला. प्रसंगावधान राखून सुरेश पवार हे रस्त्याच्या बाजूला असलेल्या शरद नागवेकर यांच्या अंगणात गेले.
मात्र, आरोपीने रिक्षा तिथेच थांबवली आणि खाली उतरला. दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने अंगणातील पाण्याचा पाईप उचलला आणि फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने सुरेश पवार यांना जमिनीवर पाडून पाईपने जबर मारहाण केली, तसेच त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला आणि डाव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फिर्यादी सुरेश पवार यांच्या तक्रारीवरून आरोपी किशोर लकाजी पवार याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.









