खिडकीची लोखंडी ग्रील कापून चोरट्याचा प्रवेश ; टीव्ही, तांब्याची भांडी व टेपरेकॉर्डर चोरीस
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली माईनवाडी येथे बंद बंगल्याला लक्ष्य करून अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. घरातील कोणीही व्यक्ती नसल्याचा फायदा घेत चोरट्याने खिडकीची लोखंडी ग्रील कापून घरात प्रवेश केला आणि सुमारे १७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना (ता. ३०) ऑगस्टला सायंकाळी साडेसात ते ३१ ऑगस्टला सकाळी साडेसात या कालावधीत घडली. या प्रकरणी शांताराम विश्राम मांडवकर (वय ६०, रा. पाली माईनवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांच्या माहितीनुसार, पाली माईनवाडी येथे सुरेंद्र सखाराम सावंत यांच्या मालकीचा बंगला आहे. हा बंगला बंद असल्याची तसेच घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या सर्व दरवाजांची कुलपे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवेशासाठी त्याने घरासमोरील खिडकीची लोखंडी ग्रील कापून खिडकी उघडली. त्यानंतर खिडकीतून घरात प्रवेश करून चोरट्याने घरातील वस्तूंची पाहणी केली. चोरट्याने घरातील सॅमसंग कंपनीचा ५५ इंच लांबीचा फ्लॅट टीव्ही, अंदाजे १५ हजार रुपये किमतीचा, चोरून नेला. याशिवाय सुमारे ५०० रुपये किमतीची तांब्याची तीन ते चार किलो वजनाची पातेले तसेच सुमारे १ हजार ५०० रुपये किमतीचे तांब्याचे तीन तांबे व त्यासोबतचे मूर्ती व जुने टेपरेकॉर्डर असा ऐवजही चोरट्याने लंपास केला. चोरीस गेलेल्या सर्व वस्तूंची एकूण किंमत अंदाजे १७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घर बंद असल्याने चोरट्याने नेमक्या कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि चोरी केल्यानंतर कोणत्या दिशेने पलायन केले, याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पाली माईनवाडी परिसरातील बंद घरे व बंगले यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून तपास करण्यात येत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.









