एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- दुचाकी गाडी न दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने कर्मचाऱ्याला काठीने डोक्यावर मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शहरातील आठवडा बाजार परिसरात घडली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून संशयित आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांडा येथील रहिवासी असलेले व सध्या रहाटाघर एसटी स्टँड परिसरात राहणारे संतोष भोजू राठोड (वय ४१) हे १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजारातील देशी बारसमोर थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी दीपक राठोड याने संतोष यांच्याकडे त्यांची दुचाकी मागितली. संतोष यांनी दुचाकी देण्यास नकार दिल्याने संशयिताचा पारा चढला. संशयित आरोपीने संतोष यांच्या डाव्या डोळ्याच्या वर काठीने जोरदार प्रहार करून त्यांना जखमी केले.
मारहाण केल्यानंतर संशयिताने ‘तू ड्युटी कशी करतोस तेच बघतो’ अशी धमकी देत जीवे मारण्याचा दम भरला. एवढ्यावरच न थांबता रस्त्यावर उभी करून ठेवलेल्या दुचाकीला लाथ मारून तिचे नुकसान केले तसेच या घटनेतील साक्षीदारालाही फोनवरून धमकावले. या प्रकारानंतर संतोष राठोड यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी दीपक राठोड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.









