अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; लोटे पोलिसांत नोंद
खेड:- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा कंपनीच्या पार्किंगमधून एका कामगाराची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोटे पोलीस दूरक्षेत्रात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण तालुक्यातील आडरे येथील रहिवासी असलेले फिर्यादी अनिकेत मिलिंद कांबळे (वय २३) हे लोटे येथील घरडा कंपनीत कामाला आहेत. २८ मार्च रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांनी आपली दुचाकी कंपनीच्या कोजन प्लांट समोरील पार्किंगमध्ये लावली होती. रात्री १० वाजेच्या सुमारास काम संपवून परतले असता, त्यांना लावलेल्या जागी गाडी मिळून आली नाही.
अज्ञात चोरट्याने पळवून नेलेली दुचाकी अनिकेत यांच्या वडिलांच्या नावावर असून ती गाडी काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न व क्रमांक एम.एच. ०८ ए.झेड. ४३९४ असून अंदाजित किंमत ५०,००० रुपये आहे.
गाडी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी आजूबाजूच्या परिसरात आणि मित्रमंडळींकडे गाडीचा शोध घेतला. मात्र, तीन दिवस शोध घेऊनही गाडी मिळून न आल्याने अखेर ३१ मार्च रोजी रात्री त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या फिर्यादीवरून लोटे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) (चोरी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोटे पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी करत आहेत.









