Monday, July 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पतसंस्थेने जप्त केलेल्या मिळकतीत घुसखोरी; चौघांवर गुन्हा दाखल

पतसंस्थेने जप्त केलेल्या मिळकतीत घुसखोरी; चौघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे सरकारी शिक्के तोडून आणि कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चौघांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पेठमाप गणेशवाडी (ता. चिपळूण) येथे ही घटना घडली असून, या कारवाईमुळे कर्जदारांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वरदायिनी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबईचे विशेष वसुली व विक्री अधिकारी सागर सुभाष कदम यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे १३ जुलै २०२६ रोजी आपल्या अधिकृत कामासाठी पेठमाप गणेशवाडी येथील मिळकतीला भेट देण्यासाठी गेले होते. ही मिळकत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या आदेशानुसार दि. २९ एप्रिलपासून वरदायिनी पतसंस्थेने कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीररित्या ताब्यात घेतली होती आणि त्यावर कायदेशीर शिक्के मारले होते.

​मात्र, १३ जुलै रोजी फिर्यादी तेथे पोहोचले असता, कर्जदार गौरी देवषी गवळी आणि त्यांचे नातेवाईक (संतोष देवषी गवळी, रवी देवषी गवळी व राजू देवषी गवळी – सर्व रा. पेठमाप गणेशवाडी) यांनी पतसंस्थेने लावलेले शिक्के तोडून, घराचे कुलूप तोडून बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केल्याचे त्यांना आढळून आले.

सरकारी मालमत्ता जप्तीच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि पतसंस्थेच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे वास्तव्य करून फिर्यादी व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३२९ (घरफोडी/अतिक्रमण), २२३ (सरकारी आदेशाचे उल्लंघन), ३(५) तसेच भारतीय दंड संहिताच्या कलम ४४१, १८८ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.