चिपळूण:- फेरफार नोंदीसाठी दहा हजार
रुपयांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या मंडल अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) याला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी त्याने कमावलेल्या सर्व प्रकारची मालमत्ता व संपत्तीची चौकशीही लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.
तक्रारदाराने मौजे चिपळूण येथे भूमापन क्रमांक १७४/१अ ही जागा खरेदी केली होती. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव दाखल होऊन फेरफार मंजूर होण्यासाठी त्यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यांनी ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद घातली होती; मात्र मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याने ८ जुलै २०२६ रोजी ही नोंद रद्द केली. त्यानंतर तक्रारदाराने २ ऑगस्ट रोजी महसूल कर्मचारी पतसंस्थेत राजेशिर्के याची भेट घेतली असता, रद्द झालेली नोंद मंजूर करण्यासाठी त्याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पुढे २३ व २७ ऑगस्ट रोजी फोन करून फेरफार नोंद मंजूर केल्याचे सांगत लाचेच्या रकमेसाठी तगादा लावला.
याबाबत तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी सायंकाळी तक्रारदाराच्या गाडीत लाच स्वीकारताना पथकाने राजेशिर्के याला रंगेहाथ पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली .









