नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीवर चंपक मैदानावर लैंगिक अत्याचार

परिचारिकांनी छेडले काम बंद आंदोलन

रत्नागिरी:- गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पिण्यासाठी देऊन नार्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. सोमवारी सकाळी चंपक मैदान येथे ही घटना घडली. पिडीत युवतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेनंतर जिल्ह्यातील परिचारिकांनी या प्रकाराच्या निषेधार्थ आज काम बंद आंदोलन छेडले.

येथील चंपक मैदानाजवळ काही नागरिकांना बेशुद्धावस्थेत पडलेली तरुणी दिसली. त्याची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या तरुणीला रत्नागिरीच्या सर्वसाधारण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. तिच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांवरुन ती संगमेश्वर तालुक्यातील देवरूख परिसरातील एका गावातील असल्याचे उघड झाले. ती एका खासगी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिकेला असल्याचेही समजले. तिच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर तिने दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली. आज सकाळी तिच्या वडिलांनी तिला देवरुख येथे एसटी बसमध्ये बसविले. त्यानंतर ती रत्नागिरीत साळवी स्टॉप येथे उतरली. नजीकच एका रिक्षामध्ये ती बसली आणि रिक्षाचालकाने तिला पाणी प्यायला दिले. ते पाणी कडू होते, असे तिने पोलिसांना जबाब देताना म्हटले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की, त्या तरुणीवर अत्याचार झाला असल्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे या प्रकारामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रशिक्षणार्थी परिचारिकेबाबत झालेल्या या प्रकाराचे पडसाद जिल्हा रुग्णालयासह संपूर्ण जिल्ह्यात उमटले. आरोग्य विभागाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत काम बंद आंदोलन छेडले. आम्ही २४ तास काम करतो. आमच्या तीन शिफ्ट असतात. त्यामध्ये आम्ही दिवस-रात्र प्रवास करीत असतो. आमच्या आरोग्य क्षेत्रातील एका आरोग्यसेविकेवर अत्याचार होत असेल तर आम्ही सुरक्षित आहोत का, असा जाब विचारला जात आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीची तातडीने बैठक होऊन आरोपीला अटक करेपर्यंत काम बंद आंदोलन छेडत आहोत, असा इशारा आरोग्यसेविकांनी दिला आहे.