Wednesday, July 1, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दारूवरून वाद विकोपाला; नातेवाईकाचा डोक्यात दगड घालून खून

दारूवरून वाद विकोपाला; नातेवाईकाचा डोक्यात दगड घालून खून

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात दारू कमी दिल्याचा राग मनात धरून एका नातेवाईकाचाच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०) याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असून, सडू सखाराम मोकाशी (वय ४२) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सडू मोकाशी आणि प्रकाश वाजे हे दोघेही नातेवाईक असून ते एकत्र कामही करत होते. सोमवारी रात्री सडू मोकाशी याने प्रकाश वाजे याला दारू कमी दिली, याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हा राग मनात धरून प्रकाश वाजे याने मंगळवारी पहाटे सडू मोकाशी गाढ झोपेत असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे सडू मोकाशीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर प्रकाश वाजे घटनास्थळावरून पळून न जाता तिथेच झोपून राहिला होता. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि संशयित प्रकाश वाजे याला अटक केली. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.