रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे (हनुमानवाडी) येथील तरुणीचे अज्ञाताने अपहरण केले. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर ला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणीची आई दामिनी दामोदर नाटेकर (वय ४५, रा. गावडे आंबेरे, हनुमानवाडी, रत्नागिरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी सानिया दामोदर नाटेकर (वय २१) हिला कोणीतरी फोन करून रत्नागिरी येथे जाऊन मोबाईलचा डिस्प्ले बदलून आणते, असे सांगितले. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली. मात्र, त्यानंतर ती घरी परतली नाही.अज्ञात व्यक्तीने तरुणीचे अपहरण करून तिला बेकायदेशीरपणे कुठेतरी नेले असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी ३० सप्टेंबरला मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला असून, तिच्याशी संपर्कात असलेल्या व्यक्तींची तसेच घटनेशी संबंधित बाबींची माहिती घेतली जात आहे. अपहरणामागील कारण आणि संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.









