दारुला पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण

रत्नागिरी:- दारु पाजण्यासाठी नकार दिल्याच्या रागातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवार 29 जुलै रोजी दुपारी 12 वा. सुमारास धमालीचे पाराजवळ घडली आहे. संदीप शिवगण (रा.गवळीवाडा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात गणेश वासुदेव सोळंकी (35, रा.हिंदू कॉलनी मारुती मंदिर,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, सोमवारी दुपारी फिर्यादी हे धमालीचे पाराजवळील दुकानात कांदे-बटाटे विक्री करत होते. त्यावेळी गवळीवाडा येथील संशयित संदीप शिवगण हा दारुच्या नशेत तिथे आला. फिर्यादींच्या दुकानासमोर येउन त्याने मला दारु पाज असे बोलू लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी माझ्याकडे तुला दारु पाजायला पैसे नाहीत असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने संशयित संदीप शिवगणने फिर्यादीला तेथील लाकडी दांडक्याने डोक्यात व पाठीवर मारुन शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 115 (2), 118(1), 352,351 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.