रत्नागिरी:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार आता अधिकच अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची शिफारस जिल्हा रुग्णालयाने चिपळूण पोलिसांकडे केली आहे. चौकशी अहवालात डॉ. मदार यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या ३ जून रोजी एका गरोदर महिलेकडे गर्भपाताचे किट देण्यासाठी ४,५०० रुपयांची लाच मागत असताना डॉ. कांचन मदार यांना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमली होती.
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. मदार कार्यरत असलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात २०२० सालापासून गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या गोळ्यांचा कोणताही अधिकृत साठा उपलब्ध नव्हता. तसेच, रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयाकडे अशा प्रकारच्या गोळ्यांची मागणीही नोंदवली नव्हती.
एसीबीने जप्त केलेल्या गोळ्यांची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली. या गोळ्या गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्याच असल्याचे तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयात साठा नसताना आणि कोणतीही अधिकृत मागणी नसताना डॉ. मदार यांच्याकडे या गोळ्या कशा आल्या? त्यांना या गोळ्यांचा पुरवठा कोणी केला? या प्रश्नांमुळे आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, पुरवठादाराचाही शोध घेतला जाणार आहे.
जिल्हा रुग्णालयाने यासंदर्भात चिपळूण पोलिसांना पत्र पाठवून डॉ. कांचन मदार यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या धक्कादायक खुलाशाने जिल्हा आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.









