Friday, July 31, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पोमेंडी बुद्रुक येथे जुन्या वादातून प्रौढावर दगडानं जीवघेणा हल्ला

पोमेंडी बुद्रुक येथे जुन्या वादातून प्रौढावर दगडानं जीवघेणा हल्ला

रत्नागिरी:- पोमेंडी बुद्रुक येथे जुन्या वादातून एका व्यक्तीवर हातातील दगडाने डोक्यात वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी किशोर लुकाजी पवार (वय ४७, व्यवसाय: रिक्षा चालक, रा. घर नं. २४७/ब, पोमेंडी बुद्रुक बौद्धवाडी) हे २९ जुलै रोजी दुपारी घरातून रत्नागिरी येथे जाण्यासाठी बस स्टॉपकडे चालत निघाले होते. वाटेत मंगेश कदम यांच्या घराजवळ आल्यावर त्यांना वाडीतील विनोद बाबू पवार भेटले, त्यामुळे ते दोघे तिथेच थांबून बोलत होते.

दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आरोपी सागर सुरेश पवार (वय ३२, रा. पोमेंडी बुद्रुक, ता. व जि. रत्नागिरी) हा तेथून गेला आणि थोड्यावेळाने वळण घेऊन परत आला. त्याने फिर्यादीजवळ येत, “तू माझ्या बाप्पाला शिवीगाळी का करतोस?” असे म्हणून जाब विचारला. त्यानंतर आरोपीने हातातील दगड फिर्यादीच्या डोक्याला डाव्या बाजूस कानावर फेकून मारला. या हल्ल्यात फिर्यादी जमिनीवर खाली पडले, त्यानंतर आरोपीने पुन्हा हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली आणि तेथून पसार झाला.
या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) व ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.