Sunday, June 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळूणमध्ये जमिनीच्या वादातून वृद्ध रिक्षा चालकाला मारहाण

चिपळूणमध्ये जमिनीच्या वादातून वृद्ध रिक्षा चालकाला मारहाण

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण शहरातील यशोधन नगर परिसरातील हॉटेल काशिराम रेस्ट हाऊस शेजारी जमिनीच्या जुन्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्ध रिक्षा चालकाला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गजानन विठोबा किंजळकर (वय ६७, रा. गोपाळकृष्ण वाडी, पाग) आणि आरोपी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जमीन-जागेवरून वाद सुरू आहेत. दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास, वादाच्या जागी आरोपी फिर्यादीला कोणतीही पूर्वकल्पना न देता जमिनीची मोजणी करत होते. याबाबत फिर्यादी किंजळकर यांनी विचारणा केली असता, याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले.

​सुरुवातीला आरोपी क्र. १ किसन भुवड याने शिवीगाळ करत हाताच्या ठोशाने व दगडाने किंजळकर यांच्या डाव्या डोळ्याजवळ प्रहार केला. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या संजय उर्फ बंड्या किसन भुवड, वैभव किसन भुवड, विश्वास भुवड (सर्व राहणार: पागनाका, गोपाळकृष्णवाडी, चिपळूण) या आरोपींनी संगनमताने फिर्यादीला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी पोटावर, पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण केली. मारहाण करत असताना आरोपींनी “हा एकटाच भेटला आहे, याला सोडू नका, ठार मारा” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

​जखमी गजानन किंजळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १०९/२०२६ अन्वये दाखल केला आहे. या गंभीर हाणामारीच्या घटनेमुळे पाग परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.