सोलापुरातील एकावर गुन्हा
चिपळूण:- तालुक्यातील कळंबस्ते येथे एकाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघा जणांची तब्बल १३ लाख २४ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी १६ मे रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद विजयकुमार पवार (रा. करंजे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष भगवान घाडगे (वय ५९, सेवानिवृत्त, रा. कळंबस्ते, ता. चिपळूण) यांनी तक्रार दाखल केली. त्यांची आणि साक्षीदार शेषराव येनाजी राठोड यांची आरोपी शरद विजयकुमार पवार याने १५ मार्च २०२४ ते ११ जुलै २०२४ या कालावधीत आर्थिक फसवणूक केली.
आरोपी शरद पवार याने सुभाष घाडगे यांना ९ लाख ४ हजार ८०० रुपये आणि शेषराव राठोड यांना ४ लाख २० हजार रुपये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. अशा प्रकारे एकूण १३ लाख २४ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.