दाम्पत्यावर गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील मिठगवाणे (सडेवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ‘गेट लावायला विसरला’ या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले असून, याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
४ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी मंगेश दामाजी खानविलकर (वय ४६) हे आपल्या मुलीसह बाहेर जात होते. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जमिनीवरून दिवाणी न्यायालयात आधीच वाद सुरू आहे. फिर्यादींना येण्या-जाण्यासाठी आरोपींच्या जागेतून गेट असून, बाहेर जाताना फिर्यादी गेट लावायला विसरले.
या किरकोळ कारणावरून आरोपी मधुकर तुळशीदास पावसकर (वय ५९) याने फिर्यादींना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “गेटचा बांबू कोण लावणार?” असे म्हणत त्याने फिर्यादींना हाताच्या थापटाने मारहाण केली, त्यांचे शर्ट पकडून मान आवळली. या झटापटीत फिर्यादींचे शर्ट, बनियान फाटले असून त्यांचा डोळ्यांचा चष्माही तुटला आहे.
वाद सुरू असतानाच आरोपीची पत्नी तेथे आली आणि तिनेही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचवेळी आरोपी मधुकर पावसकर याने जवळच पडलेली जंगली लाकडी काठी उचलून फिर्यादींच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी मंगेश खानविलकर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी ९ मार्च २०२६ रोजी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(१), ३२४(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.









