Saturday, July 4, 2026
spot_img
Home खेड खेड-खोपी-धामणंद मार्गावर भूस्खलन

खेड-खोपी-धामणंद मार्गावर भूस्खलन

कासई शिंदेवाडीजवळ दरड कोसळून वाहतूक ठप्प

खेड:- खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आज खेड-खोपी-धामणंद मार्गावरील कासई शिंदेवाडी येथे मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.दरड कोसळताना रस्त्याचा काही भागही खचून वाहून गेल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे.

पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती असून, दरड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे तसेच रस्त्याचा काही भाग खचल्याने वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने आणखी भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, खेड-खोपी-धामणंद मार्गावरील प्रवास टाळून शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.