दोघे जखमी; भेलसई पुलावरील घटना
खेड:- आंबडसहून भेलसईकडे येताना मोटारसायकलवरील तिघांचा ताबा सुटून ती पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळल्याने झालेल्या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भेलसई चौथाई येथील भेलसई पुलाच्या मागील बाजूस असलेल्या वळणावरील उतारात घडला.
या अपघातात रुपेश सुरेश धाडवे (वय ३४, रा. भेलसई गंग धाडवेवाडी, ता. खेड) यांचा मृत्यू झाला. सर्वेश शिवाजी धाडवे यांच्या उजव्या डोळ्याजवळ दुखापत झाली असून, दर्शन अनंत धाडवे (वय २१) यांच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या जवळील बोटाला दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन धाडवे, त्यांचे चुलत भाऊ रुपेश धाडवे आणि सर्वेश धाडवे हे तिघे आंबडस येथे चायनीज खाऊन यामाहा मोटारसायकल (एमएच ४३ सीएफ २१७७) वरून आंबडस-भेलसई मार्गे भेलसईकडे परत येत होते. भेलसई पुलाजवळील वळणाच्या उतारावर रुपेश धाडवे यांनी मोटारसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालविल्याने मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर मोटारसायकल पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात आदळली.
या अपघातात रुपेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलच्या पुढील भागाचे, शो व हेडलाईटचे नुकसान झाले. अपघातानंतर दर्शन धाडवे मुंबई येथे गेले होते. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी ते खेड पोलिस ठाण्यात हजर राहून दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १२८/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातासंदर्भातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.









