Friday, May 15, 2026
spot_img
Home खेड खेडनजीक भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

खेडनजीक भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

उभ्या टँकरवर झायलो कार आदळली; चौघेजण गंभीर जखमी

खेड:- महामार्गावरील मुंबई-गोवा नातूनगरनजीक गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास उभ्या टँकरवर पाठीमागून झायलो कार आदळली. या भीषण अपघातात मदिहा इम्रान जसनाईक (३५ रा. भोस्ते-जसनाईक मोहल्ला, खेड) या विवाहितेचा मृत्यू झाला. तर ३ वर्षाच्या चिमुरड्यासह अन्य ५ जण गंभीर जखमी झाले.

अब्दुल अच्चीस जसनाईक (३), सबिया मारुख जसनाईक (३३), सेहरा मारुख जसनाईक (७), इम्रान मुराद जसनाईक (४५, सर्व रा. जसनाईक मोहल्ला, खेड) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सर्वप्रथम कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी त्यांना अन्यत्र हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

झायलो कारचालक इम्रान जसनाईक हा आपल्या ताब्यातील एमएच ०८ झेड ३६९२ क्रमांकाच्या झायलो कारमधून कुटुंबीयांना घेऊन मुंबई येथून खेडच्या दिशेने येत होता. याच दरम्यान नातूनगर थांब्यानजीक एलपीजी गॅस वाहतुकीचा टँकर पंक्चर काढण्यासाठी उभा होता. भरधाव वेगाने येणाऱ्या झायलो कारची टँकरला पाठीमागून जोरदार धडक बसली.

हा अपघात इतका भीषण होता की, झायलो कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. मदिहा जसनाईक या विवाहितेस कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक ढाकणे आणि सहकारी कुलकर्णी, मिसाळ, मोहिते आणि सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.