Wednesday, August 26, 2026
spot_img
Home खेड गणेशमूर्ती वाहतूक करणाऱ्या टेम्पोला कारची जोरदार धडक, तिघे जखमी

गणेशमूर्ती वाहतूक करणाऱ्या टेम्पोला कारची जोरदार धडक, तिघे जखमी

खेडजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरात वारकरी मठासमोर मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि गणेशमूर्ती वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. पेण येथून गणेशमूर्ती घेऊन साखरप्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला बदलापूरहून गणपतीपुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील रोहन बाळकृष्ण बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिरके हे तिघे जखमी झाले असून, त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. पेण येथून गणेशमूर्ती घेऊन टेम्पो साखरप्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी बदलापूर येथून गणपतीपुळ्याकडे जाणाऱ्या वॅगनआर कारने भरणे नाका परिसरात टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, कारची दिशा बदलून ती थेट मुंबईच्या दिशेने फिरली, तर धडकेनंतर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला.

या धडकेत कारमधील तिघांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, टेम्पोमध्ये वाहून नेल्या जात असलेल्या गणेशमूर्तींचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास खेड पोलीस करीत असून पुढील कार्यवाही सुरू आहे.