Sunday, June 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोकण रेल्वेची १ महिन्यात ६१,०५१ प्रवाशांवर कारवाई

कोकण रेल्वेची १ महिन्यात ६१,०५१ प्रवाशांवर कारवाई

रत्नागिरी:- कोकण रेल्वेने मेमध्ये विनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत रेल्वे प्रशासनाने तब्बल ३.७० कोटी रुपयांचा दंड वसूल करत नियमभंग करणाऱ्यांना चाप बसवला आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात एकूण ९५१ तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमांमध्ये विनातिकीट किंवा अनियमित पद्धतीने प्रवास करणारे तब्बल ६१ हजार ०५१ प्रवासी आढळून आले. संबंधित प्रवाशांकडून रेल्वे भाड्यासह दंड आकारण्यात आला आहे.

प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखद आणि सोयीस्कर व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विनातिकीट प्रवासामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच शिस्तबद्ध प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सातत्याने राबवल्या जाणार असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

ही मोहीम रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण कोकण मार्गावर काटेकोरपणे राबवण्यात आली. विविध स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये अचानक तपासण्या करून नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यात आली.