तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या काळबादेवी-नवानगर येथे जमीन जाग्याच्या वादावरुन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश प्रभाकर मयेकर (वय ५१, रा. काळबादेवी-नवानगर, रत्नागिरी), जगदिश प्रभाकर मयेकर (वय ५५), संतोष प्रभाकर मयेकर(वय ४९, रा. काळबादेवी नवानगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना शनिवारी (ता. ११) सकाळी पावणे आठच्या सुमारास काळबादेवी नवानगर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष प्रभाकर मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित राकेश प्रभाकर मयेकर (वय ५१) यांचे जमिन जाग्यावरुन वाद आहेत. शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास फिर्यादी संतोष मयेकर यांच्या घराच्या अंगणात संशयित राकेश हा दांडका घेऊन आला व फिर्यादी यांच्या आईला तुम्ही मी करत असलेल्या बांधकामाला विरोध करायचा नाही व तुम्ही त्या हद्दीतूनही जायचे नाही तुमचे तंगडे तोडून ठेवीन असे सांगून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांच्या आईने ती जागा सामाईक आमच्या मालकीची आहे. तुच जर विरोध केलास तर आम्ही आमच्या घरात जायचे कुठून असे बोलल्याचे रागातून संशयित राकेश याने हातात दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या दारात असलेली दुचाकी ढकलून गाडीचे नुकसान केले तसेच तसेच हद्दीच्या बॉर्डरवर मोजणी करुन लावलेले सिमेंचे पोल तोडून टाकले. तसेच घरात शिरुन घरातील बॅगेत ठेवलेल जमिनीचे खरेदीखत न विचारता घेवून गेला. तसेच फिर्यादी यांच्या आईला ढकलून देवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
तर फिर्यादी राकेश प्रभाकर मयेकर (वय ५१, रा. काळबादेवी-नवानगर, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी व संशयित जगदिश मयेकर, संतोष मयेकर हे नात्याने सख्ये भाऊ आहेत. त्यांचे जमीन जागेवरुन वाद आहेत. फिर्यादी-राकेश मयेकर हे सकाळी उठल्यानंतर कामाकरिता जात असताना राकेश यांच्या घराच्या अंगणात संशयित जगदिश व संतोष यांनी बांधकाम केलेला गडगा तोडण्यास सांगितला. त्यवार फिर्यादी यांनी नकार दिला असता संशयित संतोष मयेकर पुढे आला व राकेश याला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी राकेश मयेकर यांनी ही जागा सामाईक आहे. त्यावर माझाही हक्क आहे असे सांगितले. त्याचा संशयित जगदिश याने फिर्यादी राकेश याचे कोणतेही म्हणणे ऐकुन न घेता मारण्यास सुरवात केली. त्या झटापटीत राकेश यांच्या हाताला नखे लागली. तर संशयित जगदिश याने पाठीमागून लाकडी दांडक्याने फिर्यादी राकेश यांच्या पाठीवर व हातावर मारुन दुखापत केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









