कोल्हापूरच्या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
लांजा:- लांजा ते दाभोळे मार्गावरील कोर्ले फाट्या येथून एक रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कोल्हापूर येथील एका संशयित आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल अनिल सुर्वे (वय ३० वर्ष, रा. लांजा भटवाडी) यांनी आपली ८०,००० रुपये किमतीची रिक्षा (क्रमांक एम.एच. ०८- ए.क्यु. ३९२१) दि. ११ एप्रिल च्या रात्री १० वाजता कोर्ले फाटा येथे उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना आपली रिक्षा त्या ठिकाणी दिसून आली नाही.
फिर्यादीच्या संमतीशिवाय कोणीतरी अज्ञात इसमाने ही रिक्षा चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांनी १३ एप्रिल रोजी पहाटे लांजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. पोलीसांनी या चोरीचा तपास केला असता, यामध्ये महेश रमेश यादव (वय ४२ वर्षे, रा. साई रेसिडेन्सी शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याचे नाव निष्पन्न झाले आहे.









