दापोलीत मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली; रोख रक्कम लंपास

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘कड्यावरचा गणपती’ मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी सोमवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून तेथील दानपेटी फोडली आणि त्यातील मोठी रोख रक्कम लंपास केली. सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

​मंदिराच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दानपेटी फोडताना स्पष्टपणे दिसत असून, याच पुराव्याच्या आधारे पोलीस आता आरोपींचा माग काढत आहेत.

​घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.