Thursday, May 7, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ऐनवरे येथे वाळीत टाकल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण

ऐनवरे येथे वाळीत टाकल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण

१० महिलांवर गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील ऐनवरे-फौजदारवाडी येथे सामाजिक बहिष्काराच्या (वाळीत टाकणे) वादातून एका महिलेला पिठाच्या गिरणीत घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी १० महिला आरोपींविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

​फिर्यादी सौ. रोहिणी सुभाष जाधव (वय ३५) यांची ऐनवरे फौजदारवाडी येथे ‘जय श्रीराम’ नावाची पिठाची गिरणी आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास त्या गिरणीत मसाला दळत असताना, गावातील काही महिलांचा जमाव तेथे आला.
​रोहिणी जाधव यांनी त्यांना ‘वाळीत टाकल्याची’ एक ऑडिओ/व्हिडिओ क्लिप बचत गटाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केली होती. याचा राग मनात धरून या महिलांनी रोहिणी जाधव यांच्यावर हल्ला केला.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सुप्रिया सुहास जाधव हिने बांबूच्या काठीने रोहिणी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावातील अन्य महिलांनी त्यांना शिवीगाळ करत हाताने व काठीने मारहाण केली. इतकेच नव्हे तर, “तुझ्या कुटुंबाला ठार मारू” अशी धमकीही यावेळी देण्यात आली.

​सुप्रिया सुहास जाधव, राखी राकेश जाधव, सुवर्णा सुभाष जाधव, मंगला संदीप जाधव, वनिता जाधव, अजिता आत्माराम जाधव, अजिता अजित जाधव, सुगंधा तुळशीराम जाधव, सुमन पांडूरंग जाधव, अरुणा मधुकर जाधव (सर्व रा. ऐनवरे फौजदारवाडी) ​यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या घटनेची तक्रार १६ फेब्रुवारी रोजी खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. एकाच वेळी १० महिलांवर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.