लांजा:- महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून धडक देत अपघातात क्रेटा कारमधील चारजणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालक तसेच डंपर चालक या दोघांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारने मुंबई-गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊस शांतीनगर येथे महामार्गावर बंद स्थितीत उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मुंबईच्या नागपाडा येथील कुरेशी कुटुंबातील तिघेजण आणि चालक या चौघांचा मृत्यू झाला . तसेच, कारमधील महम्मद अनस इरफान कुरेशी हे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात बुधवारी सकाळी ७ वाजता घडला . रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, क्रेटा कार हयगयीने, निष्काळजीपणे, भरधाव वेगाने चालवून बंद डंपरला पाठीमागून थडक देत अपघात करून गाडीतील चार जणांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस आणि स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी, दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी क्रेटा कार चालक मुस्तफा काफी याच्यावर तसेच मुंबई-गोवा महामार्गावर धोकादायक स्थितीत डंपर उभा करून त्याच्या मागील बाजूस टेल लाईट, रेडियम रिफॅक्टर पट्ट्या, साईट इंडिकेटर, लाईट अगर इशारा दर्शवणारी कोणतीही परावर्तित चिन्हे नसताना हे वाहन उभे करून सोडून दिले म्हणून डंपर चालक महेशकुमार नुन्नुचैद महतो (वय २६ रा. राज्य झारखंड, सध्या राहणार पाली इंद्रदीप यांचे कन्स्ट्रक्शन साइटवर) या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २०२३ चे कलम १०६(१), २८१, २८५, १२५(अ), १२५ (ब), १८४, १२२ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १२२ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १०४ सह मोटार वाहन कायदा कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे करत आहेत.









