Saturday, May 23, 2026
spot_img
Home संगमेश्वर सहलीसाठी आलेल्या सातारा येथील तरुणाचा आंबा घाटात संशयास्पद मृत्यू

सहलीसाठी आलेल्या सातारा येथील तरुणाचा आंबा घाटात संशयास्पद मृत्यू

साखरपा:- रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा आंबा घाटात जखमी अवस्थेत आढळल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हा अपघात होता की अन्य काही, याचा तपास पोलीस करत आहेत.

​मयत सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा) हा आपल्या आशिष शांताराम भावके (रा. कराड) या मित्रासोबत चारचाकी गाडीने रत्नागिरी येथे फिरण्यासाठी आला होता. रत्नागिरीचे पर्यटन आटोपून हे दोन्ही मित्र परत आपल्या घराकडे निघाले होते. ​प्रवासादरम्यान आंबा घाटात सुधीर यादव हा गाडीतून खाली उतरला. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने त्याचा मित्र आशिष भावके हा त्याचा शोध घेऊ लागला. दरम्यान, आंबा घाटातील रोडच्या साईड पट्टीवर सुधीर यादव हा गंभीर जखमी अवस्थेत हायवे पोलिसांना मिळून आला.

​हायवे पोलिसांनी जखमी सुधीरला तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.