Wednesday, May 20, 2026
spot_img
Home खेड वेरळ येथे दोन कंटेनरची समोरासमोर धडक, दोघे गंभीर

वेरळ येथे दोन कंटेनरची समोरासमोर धडक, दोघे गंभीर

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या पायथ्याशी, वेरळ येथील स्वरूप धाब्याजवळ मंगळवारी संध्याकाळी दोन कंटेनरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भोस्तेघाट उतरून मुंबईच्या दिशेने येणारा एक कंटेनर आणि गोव्याच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेमुळे दोन्ही वाहनांच्या केबिनचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातामुळे दोन्ही चालक जखमी झाले असले तरी, ट्रकमधील चालक गंभीररित्या अडकला होता. स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहनचालकांनी अथक प्रयत्न करून त्याला ट्रकमधून बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.