Wednesday, June 10, 2026
spot_img
Home खेड डंपर 35 फूट खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

डंपर 35 फूट खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

खेड सुकवली येथील घटना

खेड:- खेड तालुक्यात सुकवली-क्रशर परिसरात आज बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने खडी वाहतूक करणारा डंपर तब्बल 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर क्रमांक एमएच 08 डब्ल्यू 8471 हा खडी वाहतूक करत सुकवली-क्रशर परिसरातून जात होता. बुधवारी सकाळी सुमारे 11.40 वाजण्याच्या सुमारास चालक डंपर रिव्हर्स घेत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला. अंदाज चुकल्याने डंपर थेट रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळला.

अपघात इतका भीषण होता की डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक नितीन विजय पवार (वय 27, रा. चिंचघर-दस्तुरी) याचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ परिसरात एकच खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांच्या 24 तास विनामूल्य अपघात मदत सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्काळ मदतकार्य करत मृत चालकाला उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे हलविले.

या अपघातात नितीन विजय पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुण वयात झालेल्या त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण आणि अन्य तांत्रिक बाबींचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, या दुर्घटनेनंतर धोकादायक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.