प्रेमसंबंधातून प्रकार घडल्याची फिर्याद दाखल
लांजा:- पत्नीला फुस लावून व पळवून नेऊन बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा शहरातील आदर्शनगर येथे ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चंद्रकांत शंकर कांबळे (वय ५७, रा. आदर्शनगर, लांजा, मूळ रा. पुनस बौद्धवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी विस्तार अधिकारी असलेले ५६ वर्षीय पती विनोद माणिक सावंग (रा. आदर्शनगर, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी विनोद सावंग आणि त्यांची ४९ वर्षीय पत्नी उर्मिला विनोद सावंग हे पती-पत्नी आहेत. संशयित आरोपी चंद्रकांत कांबळे याचे फिर्यादींच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला यापूर्वी विचारणा केली असता, त्याने त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती.
फिर्यादींची पत्नी ही आपली पत्नी आहे हे आरोपीला ठाऊक असतानाही, त्याने तिला फूस लावून व बळजबरीने फिर्यादींच्या ताब्यातून पळवून नेले. तसेच तिला गुप्तपणे व बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवण्याच्या हेतूने नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १४०(३), ८४, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









