Thursday, October 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी शिळ येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा

शिळ येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा

पावणेदोन लाखांचे रसायन व साहित्य जप्त, एकावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे शिळ, कदमवाडी येथील नदीकाठच्या झाडीझुडपात बेकायदा सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर रत्नागिरी शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी जोरदार छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ९२ हजार २०० रुपये किमतीचे गूळ-नवसागरमिश्रित कुजके रसायन, तयार हातभट्टी दारू आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले असून, याप्रकरणी एका संशयिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शिळ कदमवाडी परिसरातील नदीकाठच्या निर्जन व जंगलमय भागात हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी करबुडे येथील संशयित आरोपी सुनील सुरेश आग्रे (वय ३८, रा. आग्रेवाडी, करबुडे, ता. जि. रत्नागिरी) हा विनापरवाना व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हातभट्टी दारू तयार करताना मिळून आला.

पोलिसांनी घटनास्थळावरून २०० लिटर क्षमतेच्या विविध बॅरल्समध्ये साठवलेले सुमारे २ हजार ९०० लिटरहून अधिक गूळ-नवसागरमिश्रित कुजके रसायन, ४० लिटर तयार हातभट्टी दारू, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारी ॲल्युमिनियमची डेग, लाकडी चाटू, पाईप आणि प्लॅस्टिक कॅन्स असा एकूण १ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अमिता संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनील आग्रे याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.