Thursday, October 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सोने व्यावसायिकाच्या अपहरण- लूटप्रकरणी आणखी चौघे जेरबंद

सोने व्यावसायिकाच्या अपहरण- लूटप्रकरणी आणखी चौघे जेरबंद

संगमेश्वर:- देवरूख येथील सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण, लूट आणि खंडणीप्रकरणी देवरूख पोलिसांनी आणखी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कल्याण येथून दोघांना, नवी मुंबईतून एकाला आणि बारामती येथून एकाला अटक करण्यात आली. बुधवारी झालेल्या या कारवाईनंतर या गुन्ह्यातील एकूण आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले हे चौघे या प्रकरणातील शेवटचे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींमध्ये महेश राया मोरे, तेजस रघुनाथ तांडेल, दशरथ मारुती साळुंखे आणि सचिन हरिभाऊ खुडे यांचा समावेश आहे. आरोपींना देवरूख न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

१७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास देवरूख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथे ही घटना घडली होती. देवरूखमधील मार्लेश्वर फाटा येथील सोने व्यावसायिक धनंजय गोपाळ केतकर (६३) हे मर्सिडिज कारने घरी परतत असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या सुमारे दहा जणांनी त्यांची कार अडवली. आरोपींनी केतकर यांना जबरदस्तीने दुसऱ्या कारमध्ये बसवून त्यांच्या ताब्यातील सुमारे १६ लाख रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या चेन आणि २० हजार रुपये रोख असा मुद्देमाल लुटला. त्यानंतर त्यांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास डोक्यात कठीण वस्तूने मारून दरीत फेकून देण्याची धमकीही आरोपींनी दिली होती.

अखेर १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास केतकर यांना राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील रस्त्यावर सोडून देण्यात आले. याप्रकरणी त्यांनी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग काढला या प्रकरणात देवरूख पोलिसांनी यापूर्वी नऊ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी सात आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून दोघांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, उर्वरित चार आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते.

दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे आरोपी कल्याण, नवी मुंबई आणि बारामती येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर देवरूख पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून सोमवारी संबंधित ठिकाणी रवाना करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचत बुधवारी चौघांनाही अटक केली.