Monday, September 28, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीतील बेघर निवारा केंद्रात वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरीतील बेघर निवारा केंद्रात वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्ती कोणतेही हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत गोविंद भिकाजी शितप (वय ८५, मूळ रा. कासारे आठवडा, जयगड, ता. व जि. रत्नागिरी) हे निवारा केंद्रात राहत होते. दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याच केंद्रात राहणाऱ्या जगन्नाथ मधुसुदन राणे यांनी फिर्यादी शिवानी संदीप पवार यांच्या मोबाईलवर संपर्क साधून, गोविंद शितप कोणतीही हालचाल करत नसून त्यांचे शरीर थंड पडल्याची माहिती दिली.

या माहितीनंतर फिर्यादींनी तातडीने निवारा केंद्रात जाऊन पाहणी केली. त्यानंतर शहर अभियान व्यवस्थापक श्री. काटकर यांना याची कल्पना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रुग्णवाहिका बोलावून गोविंद शितप यांना रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी ९:४५ वाजता त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक १२२/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची नाेंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलीस करत आहेत.