Tuesday, May 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी महिला बचत गटाच्या महिलांचे दागिने लांबवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

महिला बचत गटाच्या महिलांचे दागिने लांबवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

बंदिस्त करून ठेवलेल्या युवतीलाही घेतले ताब्यात

मंडणगड:- तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या चंद्रकांत तेरवणकर (आंबेळे, ता. चिपळूण) याच्या मुसक्या आवळण्यात मंडणगड पोलिसांना यश आले.

सुमारे अडीच हजार किलोमीटरहून अधिकचा प्रवास करून सापळा रचून पोलिसांनी मुद्देमालासह शुक्रवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. केवळ पाच दिवसात शोधकार्य राबवत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, याच कालावधीत बेपत्ता असलेली व तेरवणकर याने आपल्यासोबत बंदिस्त करून ठेवलेल्या युवतीलाही पोलिसांनी सुखरुप परत आणले आहे.

तालुक्यातील दाभट येथे महिला बचत गटाकरिता काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे तेरवणकर याने ९ मार्च रोजी काम करणाऱ्या समिधा येरवणकर, साक्षी सोंडकर, जागृती तांबुटकर, तेजस्वी सुतार, सानिका गायकवाड, सायली यादव या सहकारी महिलांनी ठेवण्यास दिलेले २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलीस ठाण्याची टीम पुण्याकडे रवाना झाली. मोबाईल लोकेशन, ट्रेसींग, तांत्रिक माहिती व पोलिसांनी आपले स्त्रोत वापरुन आरोपीपर्यंत जाण्यासाठी कंबर कसली. पुणे, नाशिक, मालेगाव, अहिल्यानंगर, धुळे, इत्यादी ठिकाणे तीन दिवसात पिंजून काढली. मात्र चंद्रकांत हा सराईतपणे पोलिसांना गुंगारा देण्याचे काम करीत होता. त्यासाठी त्याने अनेक सिम व ठिकाणे बदलली. त्यामुळे मोबाईल लोकेशन वरून ठावठिकाणा लागण्यास अडचण येत होती.

या अडचणीवर मात करीत अतिशय थरारक पद्धतीने पुणे येथील ग्रागीण भागात लपून बसलेल्या चंद्रकांतपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले. त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून चंद्रकांत याला शुक्रवारी चोरून नेलेल्या २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे मुद्देमालासह नाट्यमय रित्या ताब्यात घेतले.