भाजप प्रवेशाबाबत पालकमंत्र्यांकडून दिशाभूल

बाळ माने यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन

रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे त्यांना आव्हान आहे की, माझा सीडीआर तपासावा. कोणतेही भाजप कार्यालय किंवा पदाधिकाऱ्यांचे सीसीटीव्ही तपासावेत. त्यामध्ये मी गेल्याचे सिद्ध झाले, तर तत्काळ राजकारणातून मी निवृत्ती घेईन; परंतु माझा सवाल आहे सामंतांना. आपले ग्रामदैवत भैरी देवाला ते मानतात. त्यांची शपथ घेऊन त्यांनी सांगावे की, ते आजन्म एकनाथ शिंदेंबरोबर राहीन भाजपमध्ये जाणार नाही, असा पलटवार उबाठाचे उपनेते बाळ माने यांनी सामंतांवर केला.

माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, युवा अधिकारी प्रसाद सावंत आदी उपस्थित होते. माने म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोडून मी भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी विषयांतर करू नये. रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज व आरोग्यव्यवस्था, इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांसंदर्भात पालकमंत्र्यांनी बोलावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भाजपामध्ये आमच्या कुटुंबाची ६४ वर्षे गेली. माझ्या तत्त्वांना न्याय मिळत नसल्याचे दिसल्यानंतर मी भाजपच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगून भाजप सोडून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.

भाजप हाऊसफुल्ल झाली असल्याने आता तेथे जाण्याची गरज नाही. पालकमंत्री सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे स्वीय्य सहाय्यकांच्या माध्यमातून मी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत प्रयत्न

करत आहे, असे सांगितले असते तर किंचितसा विश्वास ठेवला गेला असता. स्वीयसहायक पक्ष चालवत नाहीत, असे माने यानी सुनावले. जनतेने माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रत्नागिरीत एका सिंघमची गरज होती आणि तो ठाकरेंनी रत्नागिरीकरांना दिला आहे. आता दिवाळी झाली असून, थोडे फटाके शिल्लक आहेत. ते आता वाजवायची वेळ आली आहे.

लाईफटाईम शिवबंधन बांधले

बेइमानीचे बाळकडू हे बाळ मानेंना मिळालेले नाही. मी मातोश्रीवर लाईफटाईम शिवबंधन बांधले आहे. सुरतहून गुवाहाटीवर जाणारा मी नाही, असा पलटवार बाळ माने यांनी केला.