बाळ मानेंच्या निर्णयाचा मोठा फटका; परदेशवारी देखील फिस्कटली
रत्नागिरी:- कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी ऐनवेळी घेतलेल्या नाट्यमय माघारीने कोकणातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विरोधातील सर्वच प्रतिस्पर्थ्यांनी मैदान सोडल्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महायुतीसाठी हा आनंदाचा क्षण असला, तरी या निवडणुकीत मतदान करणाऱ्या ‘मतदार राजा’मध्ये मात्र कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे.
या खास निवडणुकीत सर्वसामान्य जनता नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य मतदान करत असतात. मतदारांची संख्या मर्यादित आणि निश्चित असल्यामुळे या निवडणुकीत नेहमीच मतांचा भाव गगनाला भिडतो. बाळ माने यांच्या अचानक माघार घेण्याच्या निर्णयामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. काहींनी तर “तेलही गेले, तूपही गेले आणि हाती राहिले धुपाटणे,” अशी उपरोधिक व उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. तर काही मोजक्या नगरसेवकांनी आनंद व्यक्त करीत “निवडणूक रद्द झाली ते बर जहाल… किमान आमचं नाव तरी खराब होणार नाही” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोकणातील राजकीय वर्तुळात आणि जाहीर चर्चामध्ये या निवडणुकीतील कथित ‘घोडेबाजारा’चे आकडे नेहमीच चवीने चघळले जातात. विश्वसनीय सूत्रांनुसार आणि स्थानिक स्तरावर रंगणाऱ्या चर्चानुसार, मागील निवडणुकीत प्रत्येक मताचा दर सुमारे ३ लाख रुपयांपर्यंत गेला होता. यंदाच्या निवडणुकीत चुरस वाढल्याने हा दर प्रतिमत ५ लाख रुपये आणि सोबत एका आलिशान पर्यटन सहलीचे (टूर पॅकेज) छुपे आश्वासन मतदारांना मिळाल्याची चर्चा होती. यामुळे अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी या निवडणुकीची चातकासारखी वाट पाहत होते.
अनिकेत तटकरे यांच्या समोरील सर्वच विरोधकांनी अचानक माघार घेतल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या संभाव्य खर्चाला पूर्णविराम मिळाला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत होणाऱ्या एकूण खर्चातील काही भाग प्रतिस्पर्धी उमेदवारांनाच वाटून देऊन संबंधित तडजोडीअंती ही निवडणूक बिनविरोध करण्यात बाजी मारली गेल्याची चर्चा आता लोकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
निवडणूक बिनविरोध झाल्याने आता राजकीय ‘रीतीरिवाजा’ नुसार काहीही हाती लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून ‘लक्ष्मी दर्शना’ची आणि सहलीची स्वप्ने पाहणाऱ्या काही लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्याचा रंग पार उतरून गेला असून, कोकणातील हा राजकीय क्लायमॅक्स सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.









