रत्नागिरी:- कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते येत्या बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती माध्यमांवरून समोर आली आहे.
सहदेव बेटकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ओबीसी समाजातही त्यांचा चांगला प्रभाव असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कोकणातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा मानला जात आहे.
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्यापूर्वीच बेटकर यांनी ठाकरे सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना जोर आला होता. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सहदेव बेटकर यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपला कोकणात सामाजिक आणि राजकीय बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









