Thursday, June 11, 2026
spot_img
Home राजकीय तुषार साळवी यांची युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

तुषार साळवी यांची युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची घडामोड झाली आहे. युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख तुषार साळवी यांची शिवसेना पक्षाच्या “युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख” पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. युवासेनेचे सचिव आणि कोअर कमिटी सदस्य विकास भरतशेठ गोगावले यांच्या स्वाक्षरीने १० जून २०२६ ला हे अधिकृत नियुक्ती पत्र जारी करण्यात आले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

युवासेनेचे वरिष्ठ नेते पूर्वेशभाई सरनाईक यांच्या आदेशानुसार आणि कोकण विभागाचे युवासेना सचिव विकास गोगावले यांच्या सूचनेनुसार हे नियुक्ती पत्र साळवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे खंदे समर्थक म्हणून तुषार साळवी यांची ओळख आहे. एकत्रित शिवसेनेत असतानाही २०१४ पासून त्यांनी रत्नागिरी तालुक्याचे युवक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शिवसेना दुभंगल्यानंतरही त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची साथ न सोडता पक्षात आपले स्थान कायम राखले. सामंत यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी आणि राजकीय काम तडीस नेण्यात साळवी यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या बारा वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यामध्ये युवकांची मजबूत संघटन बांधणी करत तुषार साळवी यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक लक्षवेधी उपक्रम राबवले आहेत.

दरवर्षी आयोजित केले जाणारे महारक्तदान शिबीर हा त्यांच्या उपक्रमांचा मुख्य भाग राहिला असून, याद्वारे शासकीय रुग्णालयाला वेळोवेळी आवश्यकतेनुसार रक्त पुरवठा करण्यात आला आहे. केवळ शहरापुरते मर्यादित न राहता विविध पंचक्रोशींच्या ठिकाणी युवकांच्या मदतीने त्यांनी रक्तदान आणि आरोग्य शिबिरे आयोजित करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शैक्षणिक क्षेत्रात युवा वर्गाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सातत्याने सकारात्मक पाठपुरावा केला आहे. त्यांच्या याच दीर्घकालीन संघटन कौशल्याची आणि सामाजिक कार्याची दखल घेत वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या खांद्यावर आता अधिक मोठी जबाबदारी सोपवली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून, आगामी काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी ते सर्वांना सोबत घेऊन काम करतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या पत्राद्वारे व्यक्त केला आहे. मुन्ना देसाई यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यावर शिवसेना पक्षाने अधिकृत नियुक्ती केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्याला या पदासाठी योग्य समजून ही मोठी जबाबदारी दिली आहे. वरिष्ठ नेतृत्वाने आणि सामंत साहेबांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी दक्षिण रत्नागिरीत संघटन वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहीन. –तुषार साळवी, शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख, रत्नागिरी दक्षिण