Friday, May 1, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांची विक्री; टोळीत रत्नागिरीतील दोघांचा समावेश

बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांची विक्री; टोळीत रत्नागिरीतील दोघांचा समावेश

रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांच्या आधारे चार आलिशान मोटारींची परस्पर विक्री करून 70 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यू शाहूपुरी येथील मुख्य एजंटसह 5 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  एप्रिल व मे 2024 मध्ये घडलेल्या याप्रकरणी मुख्य सूत्रधार संजय दत्तात्रय हावलदार (रा. त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा, ता. करवीर) याच्यासह पाचही संशयित फरार असल्याचे सांगण्यात आले.

संजय हावलदारसह नीलेश रामचंद्र सुर्वे (रा. शिवाजीनगर, खेरबी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), हसन मगदूम जहाँगीरदार (रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी), महम्मद हकिम मोहम्मद हाजी (रा. मक्सूद कॉलनी, सिकंदर पार्क, छत्रपती संभाजीनगर), मनीष भय्याजी फुके (रा. येणे कोणी, ता. नरखेड, जि. नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सागर हरी देसाई (रा. सुदर्शन कॉलनी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर) व संजय हावलदार यांचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायातून त्यांची ओळख झाली. ओळखीचा फायदा घेऊन संशयिताने सागर देसाईंकडून चार आलिशान मोटारी विकण्यासाठी स्वत:कडे घेतल्या. त्यापोटी त्याने देसाई यांना 2 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिले. त्यानंतर संशयित व साथीदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे चारही आलिशान मोटारींची परस्पर विक्री करून 70 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादीने संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पसार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पाचही संशयित फरार असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असेही पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.