Wednesday, June 10, 2026
spot_img
Home चिपळूण दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण:- ओमळी येथे दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ५९ वर्षीय महिलेचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुप्रिया सुरेश उदेग (रा. कोडमळा, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे कोडमळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी सुप्रिया उदेग या ओमळी, चिपळूण येथे दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला होता.

​अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने १ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजता त्यांना कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, गेली दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजता उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

​या घटनेची माहिती उशिराने प्राप्त झाल्यानंतर, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.