बहादूरशेख नाका येथील घटना
चिपळूण:- कराड-गुहागर महामार्गावर बहादूरशेख नाका येथे २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्मथ मिलिंद कुंभार (वय १७, रा. खेर्डी शिवाजीनगर, ता. चिपळूण) हा आपली मोटारसायकल (क्रमांक MH- 08-AJ- 6492) निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवत होता. एस.एम.एस. बॅटरीच्या दुकानासमोर त्याने पादचारी भास्कर पुंजाजी कोळी (रा. मुसाड सुर्वेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भास्कर कोळी यांना उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात चालक मन्मथ कुंभार हादेखील जखमी झाला आहे. फिर्यादी रघुनाथ राजाराम सुर्वे (वय ३२, रा. कळंबस्ते, चिपळूण) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी २६ जुलै २०२६ रोजी पहाटे अल्पवयीन चालक मन्मथ कुंभार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









