Thursday, June 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्हाभरात पावसाची संततधार कायम, पुढील तीन दिवस यलो अलर्ट 

जिल्हाभरात पावसाची संततधार कायम, पुढील तीन दिवस यलो अलर्ट 

रत्नागिरी:– मान्सून सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर लक्षणीय वाढला आहे. बुधवारी देखील जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलांमुळे जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण विभागात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. २५ ते २७ जून या पुढील तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’  जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर २८ जून रोजी कोणताही मुख्य अलर्ट नसला तरी काही भागांत पावसाची हजेरी कायम राहील. शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ व २६ जून रोजी यलो अलर्ट, तर २७ जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यात एकूण ८९७.४० मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी पर्जन्यमान ९९.७१ मिमी इतके राहिले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात १३३.५७ मिमी इतका नोंदवला गेला. त्याखालोखाल मंडणगड ११६.२५ मिमी, संगमेश्वर ११५.४१ मिमी, खेड १०४.८५ मिमी आणि रत्नागिरी तालुक्यात १०१.३३ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय गुहागर ९५.६० मिमी, लांजा ९१.४० मिमी, राजापूर ७६.८८ मिमी आणि चिपळूण तालुक्यात ६२.११ मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा जोर पाहता स्थानिक महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.