जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते अनावरण
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९ हजार १९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय समीक्षा समितीच्या संयुक्त बैठकीत हा आराखडा जाहीर करण्यात आला.
एकूण पत आराखड्यापैकी ६,२६० कोटी रुपये प्राधान्य क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले असून, यामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या पत आराखड्याची विभागणी करण्यात आली आहे. यात कृषी क्षेत्रासाठी २,६०० कोटी, उद्योग क्षेत्रासाठी २,३५६ कोटी आणि इतर प्राधान्य क्षेत्र यासाठी १ हजार ३०४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. एकूण प्राधान्य क्षेत्राचे लक्ष्य ६,२६० कोटी असून
एकूण पत आराखडा (बिगर प्राधान्य क्षेत्रासह) ९,१९० कोटी इतका करण्यात आला आहे.
यंदाच्या पत आराखडा पुस्तकाचे प्रमुख आकर्षण म्हणजे, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे विशेष चित्र साकारून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील बँकिंग कामकाजाचा आढावा घेतला. कृषी, शिक्षण आणि मुद्रा कर्ज वितरणात उत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांचे त्यांनी कौतुक केले. तसेच ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा’अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक समन्वयक व शाखा व्यवस्थापकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या बैठकीस अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, रिझर्व्ह बँकेच्या एलडीओ बेनझीर शेख, नाबार्डचे डीडीएम महेश टिळेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्यासह विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.









