Wednesday, August 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

देवरुख:- आंबा घाटात कोसळणाऱ्या दरडी, खचणाऱ्या रस्त्यामुळे मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आंबा घाटातून होणारी एसटी वाहतूक मंगळवारी दुपारपासून बंद करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, एस्टी वाहतूक आंबा घाटाऐवजी लांजा – वाटुळ- ओणी पाचल अनुस्कुरा घाट मलकापूर मार्गे कोल्हापूर अशी होणार आहे.

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंडीजवळील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. खबरदारी म्हणून घाटातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर प्रशासनाने रविवारपासून आंबा घाटमार्गे एस्टीबस वाहतूक बंद केली होती. मंगळवारी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सतर्क झाले आहे. आंबा घाट मार्गे होणारी एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जारी केले आहेत. प्रत्येक आगार व्यवस्थापकांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. अनुस्कुरा घाट मार्गे वाहतूक वळवल्याने प्रवासाचे अंतर सुमारे ४५ कि. मी.ने वाढणार आहे. यामुळे प्रवाशांना जादा रक्कम मोजावी लागणार आहे.